केसगळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहात का?
केसांची वाढ न होण्यामागे असू शकतात ही कारणे
केसगळतीच्या समस्येमुळे बहुतांश जण त्रासलेले असतात. पण या समस्येमागील ठोस कारणही कोणाच्या लक्षात येत नाही. तसंच कारण न जाणून घेताच बहुतांश जण वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपचार करतात. पण यामुळे केसांचे अधिक नुकसान होण्याची शक्यता असते. केसगळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? केसांची वाढ न होण्यामागे असू शकतात ही कारणे
आपण देखील केसगळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर नेमक्या कोणत्या कारणामुळे केस गळत आहेत, हे सर्वप्रथम जाणून घ्या. त्याशिवाय कोणतेही उपचार करण्याची चूक करू नका. या समस्येमागील कारण समजून घेतल्यास त्यावर औषधोपचार करणं सोपे जाते.
साधारणतः सात कारणांमुळे महिलांचे केस जास्त प्रमाणात गळतात. याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यापैकी कोणत्याही समस्येने तुम्ही ग्रस्त असाल तर ताबडतोब उपचार करावेत. अन्यथा भविष्यात समस्या अधिक गंभीर होऊ शकतात.
सर्वात पहिले कारण तुमची हेअर स्टाइल
हेअर स्टाइल योग्य नसेल तर जास्त प्रमाणात केस गळू शकतात. जर आपण नेहमी हाय बन, अंबाडा किंवा पोनीटेल अशा स्वरुपात हेअर स्टाइल करत असाल तर यामुळेही केसांचे प्रचंड नुकसान होते; हे लक्षात घ्या. केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दोन ते तीन दिवसांचे अंतर ठेवून केस मोकळे ठेवा किंवा साधी वेणी बांधा.
जास्त प्रमाणात हेअर ट्रीटमेंट करणं
आपण जास्त प्रमाणात कलरिंग, हेअर स्ट्रेटनिंग, स्टायलिंग आणि हेअर ड्रायर इत्यादी गोष्टींचा उपयोग करत असाल तर यामुळेही केस तुटणे, केस कमकुवत होणे, केस पातळ होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यासाठीच वारंवार हेअर ट्रीटमेंट करणं टाळा. शॅम्पूने केस धुतल्यानंतर हेअर ड्रायरचा उपयोग करू नका. नैसर्गिक स्वरुपात केस सुकवणे फायद्याचे असते. हेअर ड्रायरमुळे केसांच्या मुळांवर दुष्परिणाम होतात. यामुळे केस कोरडे आणि कमकुवत होऊ लागतात. परिणामी केसांचे गळणे वाढते.
गर्भनिरोधक गोळ्या
गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानेही केसगळती मोठ्या प्रमाणात होते, याबाबतची माहिती बहुतांश महिलांना नसते. या गोळ्यांमुळे शरीरातील हार्मोन असंतुलित होऊ लागतात. ज्यामुळे केसांच्या वाढीवर आणि आरोग्यावर दुष्परिणाम होतात. अशा परिस्थिती आपण डॉक्टरांना संपर्क साधणे अतिशय आवश्यक आहे आणि शरीराच्या आवश्यकतेनुसार योग्य गोळीचे सेवन करण्याचा सल्ला घ्यावा.
0 Comments