शाल-रा.ग. जाधव
Shal By R.G.Jadhav
एकदा मी पु.
ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या
बेतात होतो; तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले,''तुम्हांला शाल दिली तर चालेल काय ?''
मी एका पायावर ‘हो’ म्हटले.
पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या
खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही.
पुढे वाईला विश्वकोशाचा
अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या
दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक
बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या ताटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे
पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होतो; पण आई तिकडे
बघतले नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली, पाचपन्नास
रुप्यांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि
म्हटले,''त्या बाळाला आधी शालीत
गुंडाळा आणि मग मासे मारत बैस,''या घटनेची ऊब पुलकित शालिच्या
उबेपेक्षा अधिक होती.
कविवर्य नारायण सुर्वे
खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या
कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना
मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, ''या शाली घेऊन घेऊन मी
आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.”
त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी
होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच
शोभते! सुर्वे मुळातच शालीन. शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही,
कधी क्षीणही झाली नाही.
मी कविवर्यांन म्हटले,"शालीमुळे शालीनता येत
असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन ; पण शेकडो शाली खरेदी करु सर्वांना एकेक
शाल लगेचच नेऊन देईन. "यावर तो शालीन कवी मनापासून
हसला.
शालीमुळे शालीनता येते
की जाते? या प्रश्नाचे माझे उत्तर ‘जाते’ असेच आहे. सन्मान
करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे.
मी 2004 साली मराठी साहित्य
संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन एक – दोन वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव
झाला. एवढ्या शाली जमत गेल्या, की माझ्या आठ बाय सहाच्या खोलीत त्यांना ठेवणेच शक्य
नव्हते. मग मी सगळ्या गोठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे
वगैरे त्याला सर्वधिकार दिले. बिचारा अतिप्रामाणिक! त्याच्याही छोट्या खोलीत त्याने
ते सांभाळले.
हळूहळू मी सगळ्या शाली
वाटून टाकल्या श्रमिकांना!
याच सुमारास मी शनिवार
पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर
बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले, की कडक थंडीच्या दिवसात एक म्हतारा, अशक्त भिक्षेकरी
कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले.
दुसऱ्या दिवशी मी दोन
शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्रटयावर आलो. तो म्हतारा होताच. त्याला दोन्ही शाली दिल्या.
त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला.
पु्ढे चार- पाच दिवस मला
काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाने
ये – जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी
नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी उठलो व पुलावरून चालू लागले.
पुलाच्या जवळपास मध्यावर
तो भिकक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे
अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दीनवाणे जिणे!
मी म्हटले,"बाबा, तुम्ही मला ओळखले?"
त्याने नकारार्थी मान
हलवली.
मग मी म्हटले, "बाबा, पाच-सहा दिवसांपूर्वी
मी तुम्हांला दोन शाली दिल्या होत्या. आठवते?"
यावर म्हातारा खुलला व
पुन्हा हात जोडून म्हणाला,"हे भल्या माणस, तू लई
मोठा! म्यास्नी शाली दिल्या! पण बाबा, म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा
पोटाची आग लई वाईट! मी शाली इकल्या व दोन-तीन दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा! आमंच हे
असलं बिकट जिणं! तुझं लई उपकार हायेत बाबा.”
शालीची शोभा आणि ऊब व
पोटाची आग आणि अन्नाची ऊब!
भुकेल्यास अन्न दयावे,
तहानलेल्यास पाणी दयावे आणि हेही जमले नाही, तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात!
0 Comments